रमेश कदमांची एन्ट्री, सोलापूरमध्ये धाकधूक वाढली

| सोलापूर | वृत्तसंस्था |

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वंचितच्या उमेदवारामुळे रंगत आलेली असताना पुन्हा एकदा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची धाकधूक एमआयएमने वाढवली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत फक्त भाजप आणि काँग्रेस अशी लढत होईल की काय अशी परिस्थिती असताना वंचित आणि एमआयएममुळे निवडणुकीला आणखी रंग चढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि उसतोड मजुराचा मुलगा असे पाहिले जात आहे. या दोघांच्या लढाईत माजी आमदार रमेश कदमांची एन्ट्री झाली आहे. तुरुंगात असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जवळपास 24 हजार मतांची लीड रमेश कदम यांना मिळाली होती.एमआयएमची पतंग रमेश कदमांनी हाती घेतली तर कुणाची दोरी कापतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी एमआयएमच्या पदाधिकार्‍यांची आणि रमेश कदम यांच्यात गोपनीय बैठक झाली. एमआयएमच्या एका विश्‍वनीय पदाधिकार्‍यांनी याची माहिती देताना सांगितले की, आम्ही एकूण चार जणांची इच्छुक यादी हैद्राबादचे खासदार तथा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठवली आहे. रमेश कदम यांचे देखील नाव त्यांना पाठविले आहे. एमआयएम लवकरच सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती एमआयएमच्या एका वरीष्ठ नेत्याने माहिती दिली आहे. बैठकीत एमआयएमचे अजहर हुंडेकरी, गाजी जहागिरदार, कम्मो शेख यांच्या सह रमेश कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version