पूरनियंत्रण समितीची शिफारस
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरानजिकचे महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यासाठी धरणाचे सहाही सांडवे खुले करण्यात येऊन सर्व्हिस गेटदेखील खुले करून बॅकवॉटरच्या पाण्याला सावित्री नदीपात्रामध्ये सोडण्यास प्रारंभ झाला आहे. मे 2022 पासून सुरू असलेल्या बॅक वॉटरचा साठा कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये आता वेगाने वाढ झाली आहे.
या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले असे आहे. या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा 121.84 मीटर्स आहे. 8 सांडव्यांवरील दरवाजे 12 मीटर्सचे प्रत्येकी आहेत. उच्चालक मोटर क्षमता 10 अश्वशक्ती आहे. धरणाची क्षमता 40 मे.टन आहे. पाणीसाठा 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर तर 55 मीटर पातळीवर 16.49 दशलक्ष घनमीटर असतो. मृतसाठा 3.6 दशलक्ष घनमीटर असून 61.50 पातळीवर वापरण्यायोग्य पाणीसाठा 26.32 दशलक्ष घनमीटर आणि 55 मीटर पातळीवर पूर्ण संचय पातळी 61.50 मीटर आहे. सांडव्यांची पातळी 55 मीटर आहे. भिंतींची पातळी 64.70 मीटर आहे. धरणाची महत्तम उंची 33.615 मीटर असून पाणलोटक्षेत्र 197.257 चौ.कि.मी इतके आहे. या धरणामुळे 2.70 चौ.कि.मी. बुडीत क्षेत्र झाले आहे. सांडव्यांची क्षमता 3248.134 घनमीटर प्रतिसेकंद एवढी आहे. या धरणाची आपत्कालीन दरवाजे, विद्युत जनित्र आणि उच्चालक क्षमता अशी ठळक वैशिष्ठयेही आहेत. पूरकाळात धरण भरलेले असताना 58.10 मीटर पाण्याची पातळी असते.
सध्या येथील पाण्याची पातळी 51.50 मीटर एवढी असून 43 आरएलपर्यंत पाण्याची पातळी खाली करण्याची परवानगी आहे. मात्र, यावर्षी धरणाच्या बॅक वॉटरची पातळी 43 आरएलपेक्षाही कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून शनिवारी सकाळपासून सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठयापैकी 22 मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद 25946 घनमीटर पाणीसाठयाचा विसर्ग होत आहे.
गतवर्षी धोक्याची पातळी ओलांडली
धरणामध्ये गेल्यावर्षी 22 जुलै 2021 रोजी चक्क 57.60 मीटर एवढी पाण्याची पातळी वाढून धोक्याच्या 58 मीटरच्या पातळीपर्यंत रातोरात पोहोचण्याची वेळ आली होती. पावसाळा सुरू झाल्यावर साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये धरणाची पाण्याची पातळी 57.40 मीटर पर्यंत पोहोचत असल्याच्या नोंदी गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत असताना गेल्यावर्षी 20 जुलै 2021 रोजीच धोक्याच्या पातळीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचल्याने या परिस्थितीबाबत उपाययोजना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली.