गावच्या कारभार्‍यांसाठी रणधुमाळी; थेट सरपंचपदामुळे अर्थकारणाचे राजकारण

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपलेल्या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना दि.18 डिसेंबरला होणार आहेत. या निवडणुकीतही आता पुन्हा महाविकास आघाडी विरूध्द बाळासाहेबांची शिवसेना सामोरे जाणार असल्याने चार निवडणुकांप्रमाणे या 16 निवडणुकांमध्येही थेट सरपंचपदामुळे होणारे अर्थकारणाचे राजकारण होण्याचे संकेत स्पष्ट दिसून येत आहेत.

तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या ग्रामपंचायतींची मुदत गेल्या सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली आहे. यापैकी भोगाव खुर्दमध्ये शिवसेना, बोरघरमध्ये शिवसेना शेकापक्ष, चांभारगणी बुद्रुकमध्ये शिवसेना, दिविलमध्ये शिवसेना, गोळेगणीमध्ये शिवसेना, कालवलीमध्ये शिवसेना, कापडे खुर्दमध्ये शिवसेना, कोतवाल बुद्रुकमध्ये भाजप-शिवसेना, कोतवाल खुर्दमध्ये शिवसेना, लोहारेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, धामणदिवी व ओंबळी काँग्रेस, पैठणमध्ये शिवसेना, पार्लेमध्ये शिवसेना, परसुलेमध्ये शिवसेना आणि उमरठमध्येदेखील शिवसेना पक्षाचे अधिपत्य होते.

यंदा मात्र, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे शिवसेनेमध्ये दोन गट सक्रीय झाल्याने चित्र बदलण्याची परिस्थिती सकृतदर्शनी दिसून येत आहे. या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली असल्याने आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळल्यास काँग्रेसच्या सोबतीने सत्ताकारण बदलण्यात यश येण्याची शक्यता आहे. भाजपने पार्ले, कोतवाल बुद्रुक आणि कोतवाल खुर्दमध्ये शिंदे गटासोबत जाण्याची भुमिका घेतल्यास निकाल पुर्वीप्रमाणेच राहण्याची शक्यता कमी आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदाची निवडणुक नसल्याने यंदा झालेल्या पहिल्या टप्प्यातील वझरवाडी, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा आणि तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवेळी पोलादपुर तालुक्यातील आतापर्यंतचा थेट सरपंचपदासाठीचा सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती प्राप्त झाली असून, या महिनाअखेरीस पोलादपूर तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक खर्च थेट सरपंचपदासाठी होण्याची परिस्थिती दिसून येणार आहे.

जि.प., पं.स.ची तयारी
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्येदेखील आगामी 16 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठीची निवडणूक झाली असल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये वारेमाप खर्च होण्याची लक्षणं दिसून येत आहेत. आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची ही पूर्वतयारी मानल्यास येत्या काळात थेट सरपंच पदांसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मतदार आणि प्रचार यंत्रणांवर सढळहस्ते खर्च करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे मतदार आणि संभाव्य उमेदवारांनीदेखील राजकीय पक्षांकडून अर्थकारणाच्या अपेक्षेतून राजकारणाची दिशा ठरविल्यास या टप्प्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असण्याचे चित्र दिसत आहे.

Exit mobile version