अवकाळीमुळे रानमेव्याला फटका

| पनवेल । वार्ताहर ।
निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा शिडकावा, गारांचा मारा वातावरणातील असमतोलपणाचा फटका वनसंपदेला बसत आहे. महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे गावरान रानमेव्याला अनुकूल वातावरण असताना अवकाळी आलेल्या पावसाने आंबा, जांभूळ व करवंदासह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्याने रानमेव्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

गावठी रानमेवा हा आदिवासींच्या रोजगाराचे एक साधन आहे. रानमेव्यामुळे डोंगरदर्‍यांत वास्तव्य करणार्‍या आदिवासींना आर्थिक हातभार मिळत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात येणारा गावरान आंबा, करवंद, जांभुळ, शेंद्र्या, गावठी आवळ्याच्या विक्रीतून प्रपंच भागवून येणार्‍या हंगामाच्या तयारीसाठी दोन पैशांचे नियोजन केले जाते; मात्र अवकाळी पावसामुळे यंदा हक्काच्या उत्पन्नावरच गदा आली आहे. विशेष म्हणजे सलग तीनचार वर्षांपासून रानमेव्याला खराब हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.

आर्थिक चणचण भासणार
राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे; मात्र अलीकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांसह फळे, फुलांना फटका बसत आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांचे वेळापत्रक पूर्णता कोलमडले आहे. शिवाय, आता तेच घडत असल्यामुळे आर्थिक संकट येणार आहे.

नैसर्गिक असमतोलामुळे नुकसान
पनवेल तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. पनवेलच्या पूर्व भागातील डोंगरदर्‍या, टेकड्या, धरण व नद्या विस्तीर्ण झाडे-झुडपे तसेच या भागात शेंद्रा, दौडी साखर्‍या, पिठल्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळा यांची झाडे आहेत, पण उत्पन्न देणार्‍या भागात मात्र नैसर्गिक असमतोलामुळे भरभरून आलेला मोहोर वातावरणाच्या कचाट्यात सापडून जळाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहोर आला आहे; मात्र ऐन फळधरणीच्या काळात पडणार्‍या अवकाळी पावसामुळे बहर झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील, अशी शक्यता आहे .

कमळीबाई ठोकळा, महिला
Exit mobile version