चौदाव्या शतकातील राजा हंबीररावांचा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांचा दुर्मिळ शिलालेख आढळून आला आहे. इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी या शिलालेखाचे वाचन करत त्यातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती उजेडात आणली आहे.
मुरुड येथील भवानी पाखाडी परिसरात जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत हा शिलालेख सापडला. विशेष म्हणजे, सुमारे 2000 साली विहिरीतील गाळ काढताना ही शिळा प्रथम आढळली होती. मात्र, अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यानंतर आता तिचे ऐतिहासिक महत्त्व समोर आले आहे. शिलालेखाची लांबी सुमारे 56 इंच आणि रुंदी 23 इंच असून, तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. हा शिलालेख “गधेगळ” प्रकारातील असून, त्यामध्ये वरच्या भागात चंद्र-सूर्य व मंगल कलश, मध्यभागी 23 ओळींचा लेख आणि खालच्या भागात शिल्पांकन आहे.
या शिलालेखात हिजरी सन 769, शके 1289 (इ.स. 1367-68) अशी कालनोंद आढळते. लेख देवनागरी लिपीत असून, त्यात फारसी शब्दांचाही वापर दिसतो, यावरून त्या काळातील भाषेवर मुस्लिम प्रभाव असल्याचे स्पष्ट होते.
शिलालेखात “नांदिगौ” (नांदगाव), “मरुड” (मुरुड) आणि “चेउळ” (चौल) या गावांचा उल्लेख आहे. तसेच राजा हंबीरराव यांना “श्रीमत्य प्रौढिप्रताप चक्रवर्ती महाराजाधिराज” अशी उपाधी दिलेली आहे. या लेखानुसार, हंबीरराव यांचे प्रधान ‘सिहीप्रो’ यांनी नांदगावातील एक वाडी 400 द्राम किमतीत घेऊन राम जोशी, कृष्ण जोशी आणि कुम जोशी यांना दान स्वरूपात वाटून दिल्याचा उल्लेख आहे. ही बातमी “Journal of Research and Development” या संशोधनपर मासिकात प्रकाशित झाली असून, या शिलालेखाचा पुढील अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
शिलालेखाची वैशिष्ट्ये
कालखंड : इ.स. 1367-68
लिपी : देवनागरी (फारसी शब्दांचा वापर)
प्रकार : गधेगळ शिलालेख
लांबी : 56 इंच
रुंदी : 23 इंच
ओळी : 23
स्थान : नांदगाव, ता. मुरुड, जि. रायगड
हा शिलालेख राजा हंबीरराव यांच्या संदर्भातील पाचवा महत्त्वाचा पुरावा आहे. याचा सखोल अभ्यास केल्यास कोकणातील मध्ययुगीन इतिहासावर अधिक प्रकाश पडू शकतो.
अनिकेत अशोक पाटील,
इतिहास अभ्यासक
