। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत हे केवळ निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ नसून ते एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आहे. या परिसरात अनेक किल्ले, लेण्या, घाटवाटा तसेच शतकानुशतकांचा इतिहास साठवून ठेवणार्या वास्तू आढळतात. अशातच कर्जतमध्ये कायम भटकंती करणार्या एका समूहाला एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजेच ‘धेनुगळ’ शिलालेख सापडला आहे.
कर्जतमधील राजमाची, पेठ, तुंगी, पदरगड आणि सोनगिरी हे काही प्रमुख किल्ले आहेत. या ठिकाणी डोंगरी भाग असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी आणि मराठा साम्राज्याच्या लढायांशी संबंधित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या कोंढाणे लेण्या या बौद्ध कालखंडातील असून त्यातील कोरीव काम आणि शिल्पकला आजही थक्क करून टाकणारी आहे. कर्जतच्या गावागावांमध्ये विखुरलेल्या विरघळी, बारव विहिरी, तसेच जुन्या समाध्या हे सर्व येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत दाखले आहेत. अशा या भूमीवर इतिहासाचे ठसे आजही अनेक ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, कर्जतमधील कायम भटकंती करणार्या अभिजीत मराठे, कौस्तुभ परांजपे, शर्वरीष वैद्य, रिनेश सोनावळे आणि मंदार लेले या समूहाला अशीच एक ऐतिहासिक गोष्ट सापडली आहे. कुसूर घाटात भटकंती करताना त्यांना ‘धेनूगळ’ ही शिळा सापडली. धेनूगळ म्हणजे ‘गाय वासरु दगड’. हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले आहेत. धेनुगळ ही फार दुर्मिळ असून मोजक्याच्या ठिकाणीच पहायला मिळते. हे ट्रेकर्स या धेनुगळीचा अजून अभ्यास करणार असल्याची माहिती समोर येत आहे.