। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील क्रमांक 66चा भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून कोंढवी फाट्याजवळील कातळी बंगला गावापर्यंत जाणारा रस्ता सुनसान झाला आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील दुतर्फा लावलेले रिफ्लेक्टर देखील गायब झाले आहेत. त्यामुळे अंधारात वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने साईडपट्टीवर उतरावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कोंढवी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या सुमारे 100 मीटर रस्त्याच्या डेंजर झोन भागावर यंदा कोणत्याही प्रकारची डागडूजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्याचा हा भाग खडबडीत झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचत असल्याने एक पोकलेन दिवस रात्र उभा करून ठेवण्यात आला आहे. कातळी बंगलापासून जुन्या कशेडी वाहतूक पोलीस टॅप लगतच्या रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ कशेडी मठामध्ये दर गुरुवारी हजारो स्वामीभक्त येत असतात. यावेळी रस्त्याला दुतर्फा रिफ्लेक्टर नसल्याने तसेच डेंजर झोन असलेल्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची डागडुजी न करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांचा प्रवास धोकादायक झाला आहे. मात्र, कशेडी घाटाला पर्याय मार्गाच्या नवीन मुंबई-गोवा महामार्गाच्या वापरामुळे या खचणार्या धोकादायक रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे या रस्त्यावरील रिफ्लेक्टर्स कोणी आणि कशी गायब केली, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी करावी. त्यासोबतच वळणाचा अंदाज न आल्याने वाहन साईड पट्टीवरून दरीमध्ये कोसळू नये यासाठी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक उभारून प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.