। नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या नादात निकृष्ठ दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांतून होत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे नागोठण्यातील एचडीएफसी बँकेसमोर असलेला सर्व्हिस रोड गुरुवारी (दि.15) सायंकाळी मोठ्या प्रमाणात खचला आहे. सुदैवाने त्यावेळी सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्यातील रेल्वे स्थानकाकडे जाणार्या मार्गासमोर बंदिस्त उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव करण्यात येत आहे. त्यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवरून महाड व मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. अशाचप्रकारे मुंबई बाजूकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा वापर मुंबई बाजूकडे जाणारी वाहने करीत आहेत. त्याच सर्व्हिस रोडवर एचडीएफसी बँकेसमोर असलेला रस्ता गुरुवारी सायंकाळी अचानक खचला आहे. या सर्व्हिस रोडच्या बाजूला पुलासाठी करण्यात येणार्या भरावालगत पाण्याचा मोठा खड्डा असल्यानेच ओलावा निर्माण होऊन हा रोड खचल्याचे बोलले जात आहे.
त्याबाबतची माहिती नागोठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना मिळाताच त्यांनी महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या अधिकार्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी खडी टाकण्यात आली. मात्र, असे असले तरी या खडीवरून मोटारसायकल व इतर लहान वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.