। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल हे तालुक्यातील संवेदनशील गाव आहे. येथूनच पुढे मुरूड तालुक्यात जाता येते. तसेच, मुरूड तालुक्यातील वाढते उद्योग व्यवसाय व पर्यटनामुळे या रस्त्यावरची वाहतूक प्रचंड वाढली आहे. चौल नाक्यावरील रस्त्याची गतवर्षीच्या पावसाळ्यातच दुरवस्था झाली आहे. परिणामी यंदाच्या पहिल्या पावसाच्या सरीनेच येथील खड्डे पाण्याने भरून गेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणार्या वाहनांना पाण्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणे त्यांना अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. दुचाकी चालकांना मधोमध पडलेले भले मोठे खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. संबधीताना पावसाळ्यापूर्वीच चौल नाका रस्ता नुतनीकरणाचे काम पुर्ण करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.