पार्सल नेण्यासाठी ड्रोनचा वापर; अवघ्या 15 मिनिटांत पोहोचणार
। नेरळ । प्रतिनिधी ।
दूरसंचार व्यवस्था आता अधिक हायटेक झाल्याचे चित्र असून माथेरान पोस्टात येणारे पार्सल आता हवेतून पोहचणार आहेत. दुर्गम भागात डोंगरावर वसलेल्या माथेरानमध्ये पोस्टाकडून अधिक जलद सेवा मिळावी यासाठी पोस्ट खात्याने हा निर्णय घेतला आहे. एकावेळी 20 किलो पार्सल घेऊन जाण्याची व्यवस्था असलेली ड्रोन सर्विसची यशस्वी चाचणी नुकतीच माथेरानमध्ये पार पडली. या चाचणीमध्ये 9.8 किलो वजन ड्रोनद्वारे माथेरान ते कर्जत असे नेण्यात आले. त्यामुळे भविष्यात माथेरान येथे पोस्टाचे पार्सल ड्रोनद्वारे येण्यास सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
माथेरान हे ठिकाण मुंबईपासून हवाई अंतराने काही मिनिटांवर आहे. मात्र, रस्ते मार्गाने काही तासांचे आहे. कुरिअर सेवेला टक्कर देण्यासाठी दूरसंचार विभागाकडून अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर करून पोस्टाकडून जलद सेवा देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामुळे 800 मीटर उंचावर असलेल्या माथेरानमध्ये पोस्टाकडून ड्रोनसेवा देण्याचा विचार सुरु आहे. त्यानुसार ड्रोन उंच उडून किती किलो वजन पेलू शकते, याची चाचणी शुक्रवारी (दि.16) दूरसंचार विभागाकडून घेण्यात आली. या चाचणीमध्ये कर्जत पोस्ट कार्यालयाच्या इमारतीवरून ड्रोन उडविण्यात आले. आणि ते अवघ्या 15 मिनिटांत माथेरानमध्ये पोहचले. त्यानंतर माथेरान येथील पोस्ट कार्यालयाच्या समोरून ड्रोन उडविण्यात आले. त्यावेळी साधारण 9 किलो 800 ग्रॅम वजन असलेले पार्सल माथेरान येथून कर्जत येथे पाठवण्यात आले. हे पार्सल अवघ्या 15 मिनिटांत कर्जत पोस्ट कार्यालयात पोहचले. त्याच कर्जत-माथेरान अंतरासाठी रस्त्याने दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे ड्रोन चाचणी यशस्वी झाली असून दूर संचार निगमकडून जल्लोष करण्यात आला.
या चाचणीनंतर माथेरानमध्ये हायटेक स्वरूपात पोस्टाची पार्सल येण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. मात्र, भविष्यात ड्रोनच्या माध्यमातून माथेरान येथे फक्त कर्जत येथून की अन्य कोणत्या शहरातून पार्सल आणली जातील, यावर पोस्ट खात्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.