मजरे जांभुळपाडा कबड्डी स्पर्धेत रासळची बाजी

| पाली | वार्ताहर |

जय हनुमान क्रीडा मंडळ मजरे जांभुळपाडा यांच्या विद्यमाने सुधागड तालुका कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 39 वा क्रीडा महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन बुधवारी (दि.5) करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढतीत जय हनुमान रासळ संघाने भैरिनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचा पराभव करीत चषकावर नाव कोरले.

या स्पर्धेदरम्यान दिव्या साजेकर या महिला खेळाडूने रायगड जिल्हा कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान, या स्पर्धेत विजयी ठरलेल्या रासळ एन संघास रोख 15 हजार व चषक, तर उपविजेतापदाचा मानकरी वावे या संघास रोख दहा हजार व चषक, तृतीय क्रमांक काळभैरव भार्जे संघास रोख सात हजार व चषक, चतुर्थ क्रमांक ओम कालभैरव आपटवणे संघास रोख सात हजार व चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू नितेश लहाने (रासळ), उत्कृष्ट चढाई सुमित मोरे (आपटवणे), उत्कृष्ट पक्कड जयेश खाडे (रासळ), पब्लिक हिरो शुभम शिंदे या खेळाडूंना प्रत्येकी कूलर व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे समालोचन अलंकार मनवी याने केले.

Exit mobile version