प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न योजनेतून 300 कोटी रुपयांचा विशेष निधी पुढील तीन वर्षांसाठी मंजूर केला आहे. त्यातून दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्याला 50 कोटी रुपये मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोकणात निसर्गपूरक उद्योग उभारायचे आहेत. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या अर्थसंकल्पात कोकणला झुकते माप दिल्याचा दावाही त्यांनी केला.
रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरण बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की प्रत्यक्ष कार्यक्रमठिकाणी येऊन भूमिपूजन करणे आवडले असते. मात्र, अधिवेशनामुळे येता आले नाही.विस्तारित इमारतीचा आराखडा चांगला असून, ग्रीन बिल्डिंग, सौरऊर्जा आदींचा समावेश आहे. ही इमारत वेळेत पूर्ण करावी आणि त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणारी इमारत उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनीसह प्रशासनाने लक्ष द्यावे.
सरकार कोकणला भरभरून निधी देत आहे. मिर्या किनार्यावर धूपप्रतिबंधक बंधारा, पोलिसांसाठी आणि कृषी योजनांसाठी लागेल तेवढा निधी देण्यात येणार आहे. रत्नागिरी ते गणपतीपुळे सागरीमार्गावर जेटबोट, रत्नागिरी विमानतळ इमारत व भूसंपादनासाठी 100 कोटी, कोकणातील सर्वोकृष्ट क्रीडा संकुल रत्नागिरीत बांधण्यात येत आहे. संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटी देण्यात येतील. कोकणातील निसर्गाचे संवर्धन करून निसर्गपूरक उद्योग उभारायचे आहेत. पालकमंत्री अॅड. परब यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी इमारतीच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेवर 20 नंतर प्रशासक
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. तिथे गटविकास अधिकारी प्रशासक नेमले आहेत. जिल्हा परिषदेचीही मुदत 20 मार्चला संपल्यावर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड काम पाहणार आहेत. त्यांनी चांगले काम केले पाहिजे. अशी संधी अधिकार्यांना कमी मिळते. त्याचा फायदा घेऊन प्रशासनाने लोकांनी त्यांचे नाव काढले पाहिजे, असे काम करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.