गुजरातचा दणदणीत विजय
। बंगळुरू । प्रतिनिधी ।
डब्ल्यूपीएलमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुजरात जायंट्सने 6 गडी राखून पराभूत केले आहे. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. आरसीबीचा डाव फक्त 125 धावांवर संपुष्टात आला. गुजरात संघाने कर्णधार अॅशले गार्डनरच्या अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष सहज पार केले. त्यामुळे आरसीबीला घरच्याच मैदानावर सलग तिसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, गुजरातची कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची फलंदाजी वाईटरित्या फ्लॉप झाली. कर्णधार स्मृती मानधना मोठी खेळी खेळू शकली नाही. ती फक्त 10 धावा करून बाद झाली. अॅलिस पेरीला तिचे खातेही उघडता आले नाही. रिचा घोषने 9 धावा केल्या. त्यानंतर राघवी बिष्ट आणि कनिका आहुजा यांनी काही काळ मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. दोघींनीही चौथ्या बळीसाठी 37 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. कनिकाने लेग-स्पिनर प्रिया मिश्राविरुद्ध सलग चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारला. राघवीने 20 धावा आणि कनिका आहुजाने 33 धावांचे योगदान दिले. परंतु, चांगली सुरुवात करूनदेखील दोघींना फारसे यश आले नाही. त्यांनर आलेल्या जॉर्जिया बेरहॅमने 20 धावा केल्या. तर, किम गार्थने 14 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच आरसीबी संघ 100 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. आणि गुजरातसमोर जिंकण्यासाठी 126 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. गुजरातकडून डिआंड्रा डोटिन आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, अॅशले गार्डनर आणि काशवी गौतम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आरसीबीने दिलेल्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. बेन मुनी 11 धावांवर आणि दयालन हेमलता फक्त 11 धावांवर बाद झाल्या. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आलेली हरलीन देओल फक्त 5 धावाच करू शकली. मात्र, त्यानंतर अॅशले गार्डनर आणि फोबी लिचफिल्ड यांनी आपल्या फलंदाजीने गुजरातला विजय मिळवून दिला. गार्डनरने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावा केल्या. तर, फोबी फिचफिल्डने 21 चेंडूत 30 धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिली. गार्डनरला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.