। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कठडा कोसळून महिना दीड महिना होण्यास येऊनही तो दुरुस्त करण्याकडे उरण नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. यामुळे सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणार्यांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांतही संतापाची लाट निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडे निधी नसेल तर लोकवर्गणीतून सदर कठडा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सदर कठड्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पुन्हा एकदा काही महिन्यातच कठडा कोसळल्याने सदरचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे उघड होत आहे. अशा प्रकारची अनेक कामे निकृष्ट होत आहेत. याबाबत लेखी तक्रारी करूनही बांधकाम विभाग हे ठेकेदाराशी असलेल्या मिलीभगतमुळे कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे तलावात सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारायला येणार्या रहिवाशांची कुचंबणा होताना दिसत आहे.
सदरचा कठडा हा काही महिन्यांपूर्वी ही असाच कोसळला होता. त्यावेळी काही दिवसांनी हा दुरुस्त करण्यात आला होता. परंतु, सदरचा कठडा पुन्हा काही महिन्यात कोसळल्याने ठेकेदाराने सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे केल्याचे उघड होत आहे. याची कोणतीही चौकशी नगरपालिका बांधकाम विभाग न करता पुन्हा एकदा लाखो रुपयांचा ठेका मंजूर करून आपला स्वार्थ साधून घेतील, अशी चर्चा जनतेत सुरू आहे. तरी सदरच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा अन्यथा पुन्हा काही दिवसांनी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिकेकडे याबाबत ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटना व पत्रकारांनी सदरचा कठडा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली होती. परंतु, सदर कामास निधी नसल्याने काम रखडल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून समजते. निधीअभावी काम रखडले असेल तर लोकवर्गणीतून काम करण्यास सुरुवात केली तर नक्कीच मदतीचा हातभार मिळेल? अशी चर्चा ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरू आहे. तलावातील कठडा कोसळून एक-दीड महिन्याचा अवधी उलटूनही दुरुस्त होत नसल्याने नगरपालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसून येत आहे.