। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
आपल्या कार्यालयातील माहिती इतर कार्यालयातील अधिकार्यांना देत असल्याच्या संशयावरून पालिकेच्या प्रभाग क्रमांक अ मधील नावडे उपविभागीय कार्यालयातील महिला कर्मचार्यांमध्ये वाद होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 27) घडला आहे. या प्रकारानंतर मारहाण झाल्याने भेदरलेल्या महिला कर्मचार्याने आपली बदली दुसर्या कार्यालयात करावी, अशी विनंती केली असून, संबंधित प्रकाराची माहिती विशाखा समितीला देण्यात आली आहे.
सदर समिती यापुढील चौकशी करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलस गावडे यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक अ मधील नावडे येथील उपविभागीय कार्यालयात काम करणार्या महिला कर्मचार्यांमध्ये काही दिवसांपूर्वी संभाषण झाले होते. झालेल्या या संभाषणाचे मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग करून त्याची ऑडिओ क्लिप दुसर्या कार्यालयातील कर्मचार्यांना शेअर करण्यात आली होती. ती क्लिप नावडे विभागीय कार्यालयातील महिला कर्मचार्याने शेअर केल्याच्या संशयावरून कार्यालयातील इतर दोन महिला कर्मचार्यांनी संबंधित महिला कर्मचार्याला जाब विचारत मारहाण केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
गुरुवारी घडलेल्या या प्रकारची दखल घेत संबंधित प्रकरण विशाखा समितीकडे वर्ग करण्यात आले आहे. समिती याबाबत योग्यरित्या चौकशी करून पुढील कार्यवाही करणार आहे.
कैलास गावडे,
उपायुक्त