16 हजार रुपयांची रक्कम केली परत
| रायगड | खास प्रतिनिधी |
आरसीएफ सीआयएसएफ हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांच्या कर्तव्यदक्षतेची चर्चा होत आहे. त्यांना आरसीएफ कंपनीच्या गेटजवळ तब्बल 16 हजार 500 रुपयांची रोख रक्कम सापडली होती. याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती रक्कम टपाल कार्यालयातील अमित भगत यांची होती. त्यावंतर त्यांना ती रक्कम परत करण्यात आली.
16 ऑक्टोबर2024 रोजी हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण आरसीएफ थळ मधील पहिल्या शिफ्टमध्ये प्रशासकीय इन गेटमध्ये तैनात असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास 16 हजार 500 इतकी रोख रक्कम गेटजवळ पडलेली त्यांना आढळली. याबाबत त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्ष प्रभारींच्या आदेशानुसार सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक व्यक्ती प्रशासकीय आऊट गेटमधून बाहेर जात असताना पँटच्या खिशातून काहीतरी काढताना पैशाचे पुडके त्या व्यक्तीच्या खिशातून पडले असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर व्यक्तीच्या हातातील सामानावरुन ती पोस्ट ऑफिस कर्मचारी असल्याची ओळख पटली. त्यानंतर टपाल कार्यालय व पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या अमित भगत या कर्मचार्याला याबाबत माहिती देण्यात आली. सीआयएसएफ उपसमादेशक संदीप चक्रवर्ती यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या उपस्थितीत हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांनी अमित भगत यांना त्यांचे 16 हजार 500 रुपये परत दिले. संदीप चक्रवर्ती यांनी हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण चव्हाण यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले चव्हाण यांना योग्य तो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास सांगितले आहे.