खाड्याचा पाडा येथील शाळेत ‘वाचन तास’ उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम तेथील शिक्षक वर्गाकडून सुरु केले जातात. कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन तास’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचा पाडा येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन कौशल्य वाढावे आणि आत्मविश्वास बळकट व्हावा, या उद्देशाने रोज दुपारच्या सुट्टीत वाचन तास हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले आहे. शाळेतील ग्रंथालयातील तब्बल 175 पुस्तकांचा प्रभावी वापर करून हा वाचन तास सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना वर्गासमोर वाचताना संकोच वाटत होता; मात्र नियमित प्रकट वाचनामुळे हा संकोच दूर झाला. दररोज एक विद्यार्थी वर्गासमोर पुस्तकाचे प्रकट वाचन करतो, तर इतर विद्यार्थी शांतपणे व लक्षपूर्वक वाचन ऐकतात. या प्रक्रियेमुळे शब्दोच्चार, आवाजातील चढ-उतार, थांबे घेणे तसेच प्रभावी सादरीकरण याबाबत विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य लक्षणीयरीत्या सुधारले आहे. यासोबतच आकलनासाठी वाचन करण्याची सवय लागल्याने गोष्टीतील संदेश, पात्रांचे स्वभाव आणि आशय समजून घेण्याची क्षमता वाढली आहे.

या उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देणारे शिक्षक संतोष नाटिकर यांचे शाळा परिसरातून विशेष कौतुक होत आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी असा वाचन तास प्रत्येक शाळेत राबविणे आवश्यक असल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वाचनाची उत्सुकता वाढली
शाळेत या वाचन तासासाठी ठेवण्यात आलेली ग्रंथालयातील सर्व पुस्तके अल्पावधीतच विद्यार्थ्यांनी आवडीने वाचून पूर्ण केली आहेत. तर आता नवीन पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. या वाचन संस्कारांचा परिणाम घरीही दिसून येत असून विद्यार्थी पालकांकडे नवीन पुस्तके आणण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून पुस्तके ही त्यांची जिवलग मित्र बनली आहेत.
Exit mobile version