रोहा पालिका! मास्क जनजागृतीच्या नावाने वसुली मोहिम?

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत संपल्याने शहरात नोकरशहांचे राज्य सुरू झाले आहे. शहरातील नागरिकांनी मास्क परिधान करावेत यासाठी शहरात एक दिवस रिक्षा फिरवून मास्क लावण्याबाबत भोंगा वाजवून सूचना देण्यात आल्या. शहरातील नागरिक विना मास्क आढळल्यास दंड वसूल केला जात असताना नगरपालिका कार्यालयात मात्र तेथील कर्मचारी विना मास्क काम करत असल्याचे दिसून आल्याने प्रशासनाची मास्क जनजागृती की वसुली मोहिम असा संतप्त सवाल रोहेकर नागरिक विचारत आहेत. कोरोना वाढतोय या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी मास्क लावून बाहेर पडणे गरजेचे आहे. पण काही वेळा नागरिक हॉटेलमध्ये चहा, नाष्टा घेण्यासाठी जात असताना किंचितसा मास्क खाली घेतात. लगेचच नगरपालिका कर्मचारी संबंधित नागरिकाची विना मास्क असल्याने दंड म्हणून तब्बल पाचशे रुपये वसूल करत आहेत. काही जण बाजारात खरेदीसाठी दोन तीनशे रुपये घेऊन येतात. पण दंडाची पाचशे रुपयांची पावती पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होत आहेत. परंतु, नगरपालिका कार्यालयातील कर्मचारी मात्र विना मास्क वावरत असताना नागरिकांकडून मात्र सक्तीने वसुली होत असल्याने संतोष पाटील या नागरिकाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नगरपालिका कार्यालयात विना मास्क कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांकडून देखील दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी संतोष पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version