शेकापकडून निवेदन देत जोरदार मागणी
खोपोली | प्रतिनिधी |
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून, सर्वसामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. पेट्रोल, डिजेल व अन्य जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले असल्याने महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढण्यापेक्षा दिल्लीत बसून महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करून सर्वसामान्य जनतेला आधार दिल्यास खर्या अर्थाने जनतेला आशीर्वाद मिळेल, अशी सडकून टीका महागाईविरोधात निवेदन देताना शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील यांनी केली आहे.
कोरोना महामारीत अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर तसेच दरडी कोसळून अनेकांची कुटुंबे उघड्यावर आली असतानाच केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या दररोज होणार्या दरवाढीविरोधात जनतेच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष खालापूर तालुका आणि खोपोली शहराच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, संतोष जंगम, उत्तम भोईर, खोपोली शहर खजिनदार जयवंत पाठक, रवींद्र रोकडे, कैलास गायकवाड, श्याम कांबळे, दिनेश गुरव, आबूशेठ जळगावकर, पुरोगामी संघटना जिल्हा सहचिटणीस भूषण कडव, खालापूर तालुका चिटणीस प्रसाद पाटील, खालापूर शहर चिटणीस आकेश जोशी, प्रवीण लाले, टेंबरी ग्रामपंचायत सरपंच दिलीप ठोंबरे, नरेंद्र शहा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी निवेदन स्वीकारले.
केंद्र शासनाने घरगुती गॅसच्या किमती कमी न करता सातत्याने वाढ करीत मिळणारी सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे गोरगरीबांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारने वाढत्या महागाईवर आळा बसविण्यासाठी काम करावे.
संदीप पाटील, शेकाप खालापूर तालुका चिटणीस