सिडकोसमोर उपोषण करण्याचा इशारा
। पनवेल । वार्ताहर ।
पेंधर गावात चारशे ते पाचशे कुळ असून त्यापैकी प्रत्येकाचा भाव अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र महसूल विभाग आणि सिडको मार्फत कुळांवर अन्याय करुन सावकार तसेच इतर महसूल अधिकारी हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. ताब्यात असलेल्या कुळाच्या जमिनी इतरांच्या नावावर करुन सिडको व प्रशासन यात गोंधळ कारभार चालू आहे. आमच्या कुळहक्काच्या जमिनींचे संरक्षण करुन न्याय द्यावा अन्यथा सिडको समोर आमरण उपोषणास बसू असा इशारा पेंधर येथील मनोज गोपीनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुंबई कुळवहिवाट शेतजमिन अधिनियम 1948 कलम 3 अ प्रमाणे 1948 मध्ये सर्व्हे नंबर 254/7+8 संरक्षित कुळ म्हणून नोंद असलेली प्रत्यक्ष ताबा कब्जा वहिवाट आणि राहत असलेले घर क्रमांक 773 चे बाजारमुल्य अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र ही जमीन कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता प्रांताधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल -3 सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ, तहसिलदार यांनी विष्णू म्हात्रे, नारायण म्हात्रे यांच्या नावे करुन कुळाची फसवणूक करण्याचा प्रयत्न संगनमताने केला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आमच्या कुळहक्काच्या जमिनी जबरदस्तीने ताबा मिळवू पाहणार्या सिडको, रस्त्याच्या ठेकेदारापासून संरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जमीन कसणार्या मागासवर्गीय कुळांवर महसूल विभाग व नगरविकास विभाग पूर्वीच्या उच्चवर्गीय खोतांप्रमाणेच अन्याय करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी प्रबोधिनीचे नेते राजाराम पाटील हे पेंधर ग्रामस्थांसोबत उपोषणास बसणार आहेत.