। पनवेल । प्रतिनिधी ।
शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना तुम्हा सगळ्यांची मला मोलाची साथ लाभली आहे. पनवेल पंचायत समितीचा सभापती त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागाचा सभापती आणि रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या पदांवरती काम केल्याचा अनुभव असल्यामुळे कोकण शिक्षक मतदार संघाचे मी यशस्वीपणे राज्याच्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करू शकलो. जिल्हा परिषदेतील निधी विनीयोगाच्या अनुभवामुळेच माझ्या आमदार निधीचा परिपूर्णरित्या वापर करून शाळांना संगणक, प्रिंटर्स, ई लर्निंग साहित्य, शैक्षणिक साहित्य देऊ शकलो याचे समाधान आहे. मला समाधान आहे की मी 60 हजार शिक्षकांना अनुदान सुरू करून देऊ शकलो, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.
ते पनवेल तालुका पुरोगामी शिक्षक आघाडीच्यावतीने पनवेलच्या वि. खं.विद्यालयात रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेकडोच्या संख्येने उपस्थित रहात शिक्षक बांधवांनी या संवाद मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला. बाळाराम पाटील पुढे म्हणाले की, पनवेल तालुक्यामध्ये के.जी.पासून पी.जी. पर्यंत अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. अर्थातच त्यामुळे पनवेल तालुक्यात शिक्षक बांधवांचे लक्षणीय प्रमाण आहे. या शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचार्यांनी आणि संस्थाचालकांनी जर का मला साथ दिली तर पनवेलचे नष्टचक्र दूर करण्यासाठी जराही वेळ लागणार नाही.
रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माजी पदाधिकारी व्हि. ए. पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी बाळाराम पाटील यांचा गौरव केल्याने आजचा कार्यक्रम हा दुग्ध शर्करा योग असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यात जोपर्यंत शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत बाळाराम पाटील यांनी स्वतःचे पेन्शन न घेण्याची जी भीष्मप्रतिज्ञा केली आहे त्याचे प्रत्येकाने आवर्जून कौतुक केले. या मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत आदी मान्यवरांसह शेकडो शिक्षक बांधव उपस्थित होते.