। चिरनेर । प्रतिनिधी ।
चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानिक भूमीपुत्रांना मिळालेल्या ठेकेदारी कामात जासईकरांना कामे हवी आहेत. स्थानिक ठेकेदारांनाच परप्रांतीय ठरवून कामांची मागणीसाठी आंदोलनकर्त्या जासईकरांची दादागिरीची भाषा यापुढे खपवून घेतली जाणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. त्यामुळे आधी चाणजे हद्दीतील प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, व्यवसायात प्रथम प्राधान्य त्यानंतरच परिसरातील इतरांना कामे देण्याची परखड, रोखठोक भूमिका सुरज तांडेल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडली.
उरण येथील बंदरातून कोळशाची वाहतूक करणार्या कंपनीतील ठेक्यावरुन स्थानिक भुमीपुत्रातच संघर्ष उफाळून आला आहे. शनिवारी (दि. 28) उरण-पनवेल लॉरी मालक-चालक संघटनेने चाणजे येथील कोळशाची वाहतूक करणार्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना परप्रांतीय ठरवून वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन कोळशाची वाहतूक करणार्या ठेकेदारीच्या कामात सहभागी करून न घेतल्यास सोमवारपासून कोळसा वाहतुकीच्या अवजड गाड्या रस्त्यातच रोखून धरण्याचा निर्णयही संघटनेने जाहीर केला आहे. उरण-पनवेल लॉरी मालक-चालक संघटनेच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर सुरज तांडेल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्थानिकांची भूमिका परखडपणे मांडली.