| तळा | प्रतिनिधी |
यंदाच्या खरीप हंगामातील भात व नाचणी पिकाकरिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. शासनाच्या दि.3 जुलैच्या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक विमा संरक्षण देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. तळा तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात संबंधित पिकांचे चालू वर्षाचे सरासरी उत्पादन जर उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले, तर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विमा नुकसान भरपाई दिली जाईल. या योजनेत तळा तालुक्यातील भात व नाचणी या प्रमुख पिकांचा समावेश असून इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेसाठी 7/12 उतारा, भाडेतत्त्वावर जमीन असल्यास नोंदणीकृत भाडे करार, ॲग्री स्टॅग फार्मर आयडी, आधार कार्ड, पीक लागवड घोषणापत्र व आधार लिंक असलेले बँक खाते या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना बँक कॉमन सर्विस सेंटर किंवा केंद्र शासनाच्या अधिकृत पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्याची अंतिम मुदत दि.31 जुलै ही आहे.
पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
