आयएसपीएलचे रजिस्ट्रेशन अलिबागमध्ये

चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

देशातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून लोकप्रिय असणारी तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि अनेक सुपरस्टार ज्या क्रिकेट स्पर्धेसोबत जोडले गेले आहेत अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राज्यातील पहिला प्रयत्न चित्रलेखा पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे.

अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटर्ससाठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024 टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळणार आहे. तसेच, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी-10 टूर्नामेंट आयएसपीएल सीझन 2 हि स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. यांचे संघमालक हे प्रसिद्ध सिलेब्रेटी असून देशाच्या प्रत्येक राज्यातून या स्पर्धेत खेळाडू निवडले जाणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख तसेच यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून वेश्‍वी-अलिबाग येथील हॉटेल मॅपल आयव्ही येथे 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धेतील खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रलेखा पाटील ऊर्फ चिऊताई यांनी केले आहे.

रजिस्ट्रेशन वेळी मा. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा, मा. नगरसेविका चित्रलेखा नृपाल पाटील, मा. उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिसशनचे सेक्रेटरी मा. नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, प्रसिद्ध समालोचक संदीप जगे, सिलेक्शन कमिटीचे अमरजीत गाध्री व इतर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

सहभागी स्पर्धकांनी येताना आधारकार्ड, पॅनकार्ड आणि दोन फोटो घेऊन यावेत. प्रथम येणार्‍या 100 खेळाडूंचे रजिस्ट्रेशन नोंदणी विनामूल्य असणार आहे. तर, 100 च्या पुढील सर्व खेळाडूंना 1 हजार 179 रुपये एवढे नोंदणी शुल्क असणार आहे. हेे नोंदणी शुल्क हे फक्त गूगल पे, फोन पे, पेटीएमद्वारेच भरता येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आलेले आहे.
Exit mobile version