उच्च दाब वीज मनोरे उभारणीला पुन्हा सुरूवात
। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार शेतकर्यांच्या समस्या व प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत उच्च दाब वीज वाहिनी मनोरे उभारण्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश महापारेषण कंपनीने मान्य केले होते. तरीदेखील हे मनोरे उभारण्याचे काम बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीने स्थानिक दलालांना हाताशी धरून पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकरणी शेतकर्यांचा भडका उडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून येथील शेतकरी संघर्ष समितीने नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पेण तालुक्यातील डोलवी येथील जे.एस.डब्लू. स्टील कंपनीसाठी नागोठणेजवळील कानसई येथील महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातून उच्च दाबाची वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट पुणे या ठेकेदार कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र, या उच्च दाब वीज वाहिनीमुळे बाधित होणार्या रोहा तालुक्यातील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटीसा वा आर्थिक मोबदलाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बाधित शेतकर्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वत्र अर्ज निवेदने दिली आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून व महापारेषण तसेच जेएसडब्लू स्टील कंपनीकडून शेतकर्यांना दाद देण्यात आली नाही. शेवटी त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी 16 एप्रिल रोजी रोह्याचे प्रांताधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देत आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत 2 मे रोजी रोहा प्रांताधिकारी कार्यालयात शेतकरी व संबधित अधिकार्यांची बैठक प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.
याच बैठकीत उच्च दाब वीज मनोर्यासाठी विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली असून ठरावही मंजुर करण्यात आले होते. तसेच, महापारेषण कंपनीने शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या पुर्ण होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे देखील मान्य केले होते. परंतु, असे असतानाही पळस व कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत मनोरे उभारण्याचे काम सुरू झाल्याने शेतकर्यांचा भडका उडाला आहे. त्यामुळे स्थानिक दलालांच्या विरोधात शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.







