शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची मध्यस्थी; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश पराते यांचे आश्वासन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील खानावमधील पुलाच्या भगदाडात पडून चांगू घरत यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी त्यांच्या नातेवाईकांना पंधरा लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत ग्रामस्थांनी ठाम भुमिका घेतली होती. या भूमिकेला शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दुजोरा देत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि उपअभियंता दिनेश पराते यांनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
खानावजवळील पुलामधील भगदाडात पडून अंदाजे 65 वर्षीय चांगू घरत या वयोवृद्ध पादचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांमधून करण्यात आला. यावेळी मृताच्या नातेवाईकांना 15 लाख रुपयांची भरपाई द्या, त्यानंरतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जा अशी भुमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनासह बांधकाम विभागाची तारांबळ उडाली. परंतु, प्रशासन मात्र निर्णय घेण्यास अपयशी ठरत होते. त्यानंतर शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित विभागाचे अधिकारी पराते यांना धारेवर धरले. तात्काळ उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची महिती दिली. खानावमधील ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. एका कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने त्यांच्या कुटूंबाना भरपाई दिलीच पाहिजे, ही ठाम भुमिका ग्रामस्थांनी घेतली, याची जाणीव चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांच्यासह उपसरपंच निलेश गायकर व ग्रामस्थांच्या भुमिकेसोबत प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रभारी उपअभियंता दिनेश पराते यांनी 15 लाख रुपये देण्याचे कबूल केले. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने ही भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, चार ते पाच तास या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, शेकापचे कार्यकर्ते नयन पाटील, खानावचे सरपंच अजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील, प्रणित पाटील, साहिल म्हात्रे आदी मंडळी उपस्थित होते.
