। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वासराला जन्म देताना अडकलेल्या गोमातेला तिच्या वासरासह सुखरूप ठेवणार्या पाच चिमुकल्यांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. यामुळे आता गाय आणि तिचे वासरू दोघेही सुखरूप आहेत.
याबाबत या घटनेचे प्रत्यक्षदर्शी अमोल शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वरमधील आठवडा बाजाराजवळून शास्त्री नदी वाहते. याच नदीपलीकडे कोंडअसुर्डे गाव आहे. याच परिसरात एक गाय वासराला जन्म देत होती. त्या वेळी परिसरातील काही चिमुकली तिथे खेळत होती.
वासराला जन्म देताना गाय अडकली आणि तिला होणारा त्रास पाहून यापैकीच फहीम सय्यद, फहीज सय्यद, तौफीक शेख, हर्ष सावंत, अथर्व चव्हाण ही 10 ते 11 वर्षे वयाची चिमुकली तिथे धावली. त्यांनी आपल्या परीने प्रयत्न करून या गायीची आणि तिच्या वासराची सुखरूप सुटका केली.
गाय आणि वासरू सुखरूप असल्याचे पाहून या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमोल शेट्ये यांनी या मुलांजवळ चौकशी केली असता त्यांच्याकडेही पाळीव जनावरे असल्याने त्यांनी हे प्रसंग यापूर्वीही अनुभवले आहेत आणि अशा मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम तयार असल्याचे सांगितले. यानंतर शेट्ये यांनी या गायीच्या आहाराची व्यवस्था केली.
दरम्यान, एवढ्या छोट्या वयात असतानाही प्रसंगावधान दाखवत या चिमुकल्यांनी केलेले चांगले काम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या उनाड जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असताना अशा जनावरांच्या बाबतीत घडणार्या दुर्दैवी घटनाही अनुभवायला येतात. अशा स्थितीत या जनावरांचे संगोपन संबंधित मालकांनी केल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत.
अमोल शेट्ये, स्थानिक







