रिलायन्स कंपनीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटला

आमदार पंडित पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रिलायन्स कंपनीच्या केमिकलयुक्त सांडपाण्याची लाईन शेतकऱ्यांच्या शेतात फुटून शेती नापिक होत असल्याची मोठ्या प्रमाणात तक्रार शिहू – बेणसे विभागातील शेतकऱ्यांकडून मागील अनेक दिवसापासून होत होती. त्या संदर्भात आज माजी आमदार पंडितशेठ पाटील व युवा नेते प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सोबत घेत रिलायन्स कंपनीवर धडक देण्यात आली. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी वर्ग, तसेच कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सदर प्रश्नावर शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंडितशेठ पाटील व प्रसाद भोईर यांनी स्वतः पहाणी करून महसूल यंत्रणेला केमिकल युक्त पाण्याचे व जमिनीचे सॅम्पल घ्यायला लावले. यानंतर कंपनी प्रशासनाला इशारा देताना कंपनीच्या हलगर्जी पणामुळे झालेले नुकसान भरपाई योग्य प्रकारे न केल्यास कंपनीविरुद्ध मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पंडितशेठ पाटील व प्रसाद भोईर यांच्याकडून देण्यात आला.

झालेल्या नुकसान भरपाईचे शासनाकडून पंचनामे होऊन परिमाणित निकशांद्वारे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रोख स्वरूपात न देता चेक द्वारे देण्यात यावी अशी मागणी युवा नेते प्रसाद भोईर यांनी केली. माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी,रिलायन्स कंपनी प्रशासन व जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना केली.

यावेळी रिलायन्स कंपनी प्रशासनातर्फे किर्लोस्कर, गोडबोले हे अधिकारी तर शिहू, चोळे, झोतिरपाडा – बेणसे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पेण पंचायत समिती मा. सभापती संजय भोईर, सदस्य घनश्याम कुथे,दत्ता कुथे,बाजार समिती उपसभापती रामदास घासे,शेकाप चिटणीस चंद्रकांत म्हात्रे,अरुण शेळके, मंगल खाडे, मधूकर घासे,यशवंत घासे,झोतिरपाडा सरपंच प्रसाद कुथे,प्रविण कुथे,अनंत भुरे,काशिनाथ ठाकूर, सुधाकर पाटील, योगेश ठाकूर,नामदेव म्हात्रे, सुरेश कुथे आदि प्रमुख शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते

Exit mobile version