। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जतकरांचा जनआक्रोश दिवंसेदिवस वाढत चालला आहे. वाढीव मालमत्ता करावरुन आक्रमक झालेल्या नागरिकांनी गुरुवारी घनकचरा प्रकल्प दुसर्या पर्यायी जागेवर हालविण्यात यावा, या मागणीसाठी घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुंडगे, भिसेगांव, नांगुर्ले गाव तसेच घनकचरा प्रकल्पालगत असणार्या वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याला कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प धोकादायक ठरत आहे. हा धोकादायक प्रकल्प दुसर्या पर्यायी जागेवर हालविण्यात यावा, या करिता हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गुंडगे, भिसेगाव चारफाट मार्गे हायवे वरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाजारपेठमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून नगरपरिषद कार्यालयात आला.
नगरपरिषद कार्यालया बाहेर सभेत रूपांतर झाले, याप्रसंगी जे. के. पिरकड, सरपंच जयेंद्र देशमुख, कैलास म्हामले, भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, राकेश देशमुख, भावना पवार, दर्शना पवार, गुंडगे नगरसेविका वैशाली मोरे, नगरसेवक उमेश गायकवाड,मिलिंद भोईर, माजी नगरसेवक दिपक मोरे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम जाधव नगरसेवक बाळाजी विचारे, उपनगराध्यक्ष वसंत सुर्वे यांनी आपले विचार मांडले.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिलेल्या निवेदनात कर्जत नगरपरिषदेवा हा घन कचरा प्रकल्प गुंडगे, भिसेगांव, नांगुर्ले गाव तसेच प्रकल्पालगत असणार्या वसाहती परिसरातील नागरिकांना आजरपणाचे आमंत्रण देणारा आहे. या प्रकल्पातून रोज दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अक्षरशः घराची दारे, खिडक्या बंद कराव्या लागत आहे. सुरुवातीला या प्रकल्पात गांडूळ खत प्रकल्प सुरू होता. त्यामुळे फारसा वास येत नव्हता. परंतु आता या प्रकल्पामध्ये कचर्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्याच बरोबर या प्रकल्पात रोज संध्याकाळी खराब झालेली राहलेली मच्छी टाकली जाते. खांडपे तसेच इतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल मधील घाण टाकली जाते. या सर्व प्रकारामुळे या भागातील शुद्ध हवा अशुद्ध झाली आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हे प्रदूषण रोखण्यास कर्जत नगरपरिषद अपयशी ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मोर्चातील शिस्ट मंडळाने मुख्याधिकारी वैभव गारवे यांची सभागृहात भेट घेतली त्याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगसेवक राहुल डाळींबकर, नगरसेविका पुष्पा दगडे, नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते.शिस्ट मंडळातील माजी नगरसेवक अरविंद मोरे, विद्यानंद ओव्हाळ, लालधारी पाल, अमोघ कुळकर्णी, नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, सरपंच कैलास म्हामले माजी नगरसेवक दिपक मोरे, बाळाजी विचारे, महेंद्र कानिटकर, जितरत्न जाधव, भारत वाघमारे यांनी घनकचरा प्रकल्पाबाबत काही प्रश्न उपस्थित केले.
शहरातील कचरा उचलणार ठेकेदार योग्य काम करत नसेल तर त्याला नोटीस देण्याच यावी. तसेच घनकचरा प्रकल्पातील त्रुटी दूर करून योग्य नियोजन करा जेणे करून नागरिकांना त्रास होणार नाही.
सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष
घनकचर्यासाठी सध्या पर्यायी जागा नाही याबाबाबत वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार करण्यात येईल, सध्याच्या घनकचरा प्रकल्पात तांत्रिक त्रुटी असतील त्या त्वरित दूर करण्यात येतील.
वैभव गारवे, मुख्याधिकारी