अलिबाग-वडखळ रस्त्यावरील गवत रोहयोतून काढा

माजी आ. पंडित पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेकडे जिल्हा प्रशासन सातत्याने डोळेझाक करीत आहे. खड्ड्यांमुळे गायब झालेल्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. शासनाकडे जर रस्त्याच्या बाजूचे गवत काढण्यासाठी पण पैसे नसतील, तर रोजगार हमी योजनेतून गवत काढा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.

या रस्त्याबाबत सातत्याने आवाज उठविणार्‍या पंडित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वडखळ-धरमतर रस्त्याची दुरुस्ती जेएसडब्ल्यू कंपनीने हाती घेतली असून, काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या रस्त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असताना प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबत पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अलिबागकडे येणारा प्रमुख रस्ता असणार्‍या अलिबाग-वडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतामुळे आजूबाजूचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे गवत तात्काळ कापण्याची गरज आहे. मात्र, या प्रश्‍नाकडेदेखील जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत आहे. जर जिल्हा प्रशासनाकडे हे गवत कापण्यासाठीदेखील पैसे नसतील, तर रोजगार हमी योजनेतून गवत काढा, अशी सूचना त्यांनी केली. रोजगार हमी योजनेचे पैसे पडून असतानादेखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावागावात तरुणांना आज रोजगार नाही. प्रत्येक गावात गवत कापण्याचे यंत्र उपलब्ध आहेत. रोहयोने हे गवत काढून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी सूचित केले आहे.

Exit mobile version