| पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीतर्फे बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाचे नामांतरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे करण्यात आले आहे. या निमित्ताने नगरपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रमुख मार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिल्याने भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उद्घाटन सोहळ्यात मार्गाचे नामफलक अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव करत ‘जय भीम’चा जयघोष केला.
नगरसेवक सुधीर भालेराव यांनी यापूर्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. यात हटाळेश्वर चौक ते तहसील कार्यालय या मार्गाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि नगरपंचायतीने जन भावनेचा आदर करून हा निर्णय घेतला. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी होत असून, त्यानिमित्ताने पाली नगरपंचायतीनकडून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा मार्ग आता अधिकृतपणे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ म्हणून ओळखला जाणार आहे.
पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण
