। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या इमारतीला नवा साज देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे. सध्या जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले असून नवीन बांधकाम डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून करण्याचे नियोजन आहे. या दुमजली बांधकामासाठी 3 कोटीचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यापैकी 1 कोटीची रक्कम आजपर्यंत जमा करण्यात आली आहे. उर्वरित दोन कोटी उभे करण्याचे काम सुरू आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय ही रत्नागिरीतील सर्वात जुनी संस्था आहे. ज्या शहरातील वाचनालय गजबजलेले ते शहर सुसंस्कृत म्हणून गणले जात होते. तो वसा आजही रत्नागिरीत पाळला जात आहे. ग्रंथसंपदेने समृद्ध हे वाचनालय आजही सुजाण वाचकांनी गजबजलेले असते. तसेच, बहुआयामी उपक्रम ज्या वास्तूमध्ये होत होते ती वास्तू जुनी झाली. त्यामुळे ही वास्तू पाडून तिथे नवीन वास्तू उभी राहणार आहे. वाचनालयाची जागा शासनाकडून लीज अॅग्रीमेंटने 2048 पर्यंत प्राप्त करण्यात यश प्राप्त झाले. लगेच बांधकाम परवानगीही मिळाली. त्यानुसार 11 हजार 500 चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी नियोजन सुरू आहे. या वाचनालयास 2028च्या जानेवारीमध्ये 200 वर्ष पूर्ण करताना वाचनालयाची नवी वास्तू परिपूर्णपणे उभी राहावी यासाठी भरीव आर्थिक योगदानाची आवश्यकता आहे.