। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणार्या पानवल धरणाचे 60 वर्षांनंतर मजबुतीकरण होणार आहे. विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये हे काम रेंगाळले होते. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामुळे 20 कोटींच्या कामाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने त्यासाठी निधी दिला आहे. रत्नागिरी पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याला दुजोरा दिला आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण 1965 बांधण्यात आले होते. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणार्या धरणांपैकी हे एक आहे. शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे; परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे.
यातच आता पानवल धरणाला 40 ते 50 टक्के गळती लागली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे, गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे काळाची गरज आहे. या धरणाच्या मजबुतीकरणासाठी पालिकेने जलसंपदा विभागाला 20 कोटींचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला. पालिकेने याची निविदा प्रक्रिया सुरू केली; परंतु विधानसभा आचारसंहिता आल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया करून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर धरणाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.