। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सोमवारी याबाबत स्थानिक डीएड, बीएड बेरोजगारधारकांनी शिक्षणाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी आठवडाभरात ही प्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले असून जिल्ह्यात 500 जागा रिक्त आहेत.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला होता. त्यानुसार आदेश देखील काढला गेला होता. कंत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला 15 हजार रुपये हे मानधन मिळणार आहे. वर्षाला 12 रजा असणार आहेत, जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते. या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत 25 सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते. जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वतः च्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे. यामुळे हे वातावरण आणखी चिघळले होते.