‌‘जलसंजीवनी’मधून सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात युनायटेड वे या संस्थेच्या माध्यमातून जलसंजीवनी अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाथरज ग्रामपंचायतीमध्ये तीन सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. तालुक्यातील 11 गावांमध्ये मृदू आणि जलसंधारणाची कामे युनायटेड वे संस्थेच्या जलसंजीवनी अभियानामधून सुरू आहेत.‌ ‘युनायटेड वे मुंबई’ संस्थेद्वारा कार्यान्वयित आणि ओवेन्स कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्वारा अर्थ सहाय्यीत समग्र ग्राम विकास कार्यक्रम राबविला जात आहे.

कर्जत तालुक्यातील पाथरज आणि वारे ग्रामपंचायतीमधील 11 गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तेथील जुन्या सिमेंट बंधाऱ्यांचे खोलीकरण, तसेच दुरुस्ती अशी कामे केली जात आहेत. जल आणि मृदा संधारण संबंधित कार्यावर प्रकर्षाने भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे, मागील वर्षी युनायटेड वे मुंबई संस्थेने पाथरज ग्रामपंचायतीमधील डोंगरपाडा या ठिकाणी तीन सिमेंट नाला, बांध यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यातील एका नाल्याचे खोलीकरण करण्यात आले, तर 26 अनघड दगडी बांध बांधले. त्यामुळे सभोवतालच्या जलस्त्रोतांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या विहीर पातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या वाढलेल्या जलसाठ्याचा फायदा सात शेतकऱ्यांना झाला आहे. त्या शेतकऱ्यांनी त्या पाण्याचा वापर करून पहिल्यांदाच सुमारे 21 एकर क्षेत्रात रब्बी भाजीपाला लागवड केली. ज्यात बहुपीक पद्धत अवलंबली असून, मुख्य पीक काकडीसोबतच मिर्ची, टोमॅटो, वांगी, मुळा कोबी, मेथी, कोथमिर यांसारख्या पिकांचा समावेश आहे.

जल संजीवनी अभियानात उपक्रमात पाणी जरी विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्या पाण्याचा मोकाट पद्धतीने गैरवापर न करता शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन प्रणालीद्वारे आवश्यक तेवढेच पाणी काटेकोरपणे वापरावे, असे आवाहन युनायटेड वे कडून करण्यात येत आहे. या भागातील शेतकरी गजानन लोहकरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदाच कोबीची लागवड केली असून, त्यात त्यांना चांगला नफा झाला आहे. बाळू लोहकरे यांनी यावर्षी रब्बी पिकानंतर परत एकदा उन्हाळी काकडीची लागवड केली आहे. तर दरवर्षी भातपिकानंतर रिकामी असलेली जमीन यावर्षी मात्र तिन्ही हंगामात पिकांनी व्यापली गेली आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.

Exit mobile version