| तळा | वार्ताहर |
तळा शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची अखेर नगरपंचायतीकडून डागडुजी करण्यात आल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तळा शहराच्या प्रवेशद्वारावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे. या झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने दिवसेंदिवस हा रस्ता उखडून त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. रस्त्याची मोठमोठी डबर उखडून बाहेर पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे टायर फुटून अपघात घडण्याची शक्यता असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यांसह पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळ्यात रस्त्याची आणखी दुरवस्था होऊन अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. अखेर नगरपंचायत प्रशासनाकडून या रस्त्याची डागडुजी करण्यात आल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.