गांधारी पुलाची वर्षाच्या आतच दुरुस्ती

महामार्गाच्या गुणवत्तेवरील प्रश्‍नचिन्ह
| महाड | प्रतिनिधी |
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात मोहोप्रे गावाजवळ गांधारी नदीवर बांधलेला पूल एक वर्षाच्या आतच दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला आहे. याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून एक वर्षाच्या आतच या पुलाची दुरुस्ती करण्याची नामुष्की एल.अँड.टी. कंपनीवर आली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेबाबत असलेला प्रश्‍न कायम राहिला आहे.

महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील चौपदरीकरण सुरू आहे. या कामात महाड जवळील मोहोप्रे गावाजवळ असलेला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाला रस्ता आणि पूल यामधील असलेला जोड नादुरुस्त झाल्याने शनिवारपासून या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. एक वर्षाच्या आतच या ठिकाणी दुरुस्ती करण्याची नामुष्की एल. अँड. टी. कंपनीवर आल्याने संपूर्ण महामार्गाच्या गुणवत्तेचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी सदर महामार्गाचे काम सन 2021 अखेर पूर्ण करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. केंद्रीय नितीन गडकरी यांनी हे आश्‍वासन पूर्ण देखील केले असते मात्र महामार्गाच्या कामात लागणार्‍या विविध परवानग्या पूर्ण करून देण्यात स्थानिक महसूल आणि महामार्ग प्रशासनाला अपयश आले. यामुळे हा महामार्ग आजही अपूर्णावस्थेत आहे.

महामार्गाचे काम गेली दहा वर्षापासून सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्णपणे निकृष्ट झाल्याने पहिला टप्पा आता काँक्रीटच्या मध्यामातून केला जात आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील काम देखील काँक्रिटचे होत आहे. मात्र महामार्गाच्या कामात अनेक छोट्या मोठ्या चुका असल्या तरी महामार्गाचे काम पूर्ण करुन शासनाकडे सुपूर्द करण्याकडे महामार्ग कामातील ठेकेदार कंपन्यांनी सपाटा लावला आहे. यामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी नावातील बदल, पुलांची कामे, चुकीच्या पद्धतीने दिलेले बायपास, यामुळे बहुतांश ठिकाणी धोकादायक स्थिती दिसून येते.

Exit mobile version