सत्ताधारी प्रभावक्षेत्रातील निवडक शाळांवर कोट्यवधींची बरसात; सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 315 शाळा नादुरुस्त असताना सत्ताधारी प्रभाव क्षेत्रातील निवडक शाळांवर कोट्यवधी रुपयांची बरसात होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. एकाच शाळांवर दोन ते तीन वेळा खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने माहितीचा अधिकार अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांमधून प्राथमिक शाळांच्या दुरुस्ती व विकासकामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने माहितीचा अधिकार अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांमधून प्राथमिक शाळांच्या दुरुस्ती व विकासकामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिल्ह्यात 315 शाळा अजूनही नादुरुस्त (जून 2026 पर्यंत), 25 कोटी 83 लाख रुपयांची गरज असताना निधी अपुरा, रखडलेला तसेच अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, पटसंख्या घट (29 शाळा बंद), शिक्षक रिक्त (971 पदे) अशी परिस्थिती असताना केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांच्या कार्यक्षेत्रातच बहुतांश निधी खर्च व एकाच शाळांवर दोन-तीन वेळा खर्च होत असल्याचे उघड झाल्याने जिल्हा नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका संजय सावंत यांनी केली आहे.
सावंत यांच्या माहितीनुसार, सहाण, कुसुंबळे, सारळ, कुर्डुस, धाकट शहापूर, चौल यांसारख्या शाळांवर वेगवेगळ्या वर्षांत दुरुस्ती, नवीन इमारत, वर्गखोल्या किंवा स्वच्छतागृह अशा विविध कामांसाठी पुन्हा पुन्हा निधी मंजूर झाल्याची नोंद आहे. काही शाळांवर एकापेक्षा अधिक विकासकामे मंजूर करण्यात आल्याचे दस्तऐवज दर्शवितात. दस्तऐवजात वाडगाव येथे नवीन शाळा इमारतीसाठी 50 लाख, वाडगाव येथेच दुरुस्तीसाठी 10 लाख, सहाण येथे नवीन शाळा इमारतीसाठी 20 लाख, तसेच जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी 3 लाख ते 20 लाखांपर्यंत दुरुस्ती व इतर कामांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आहे.
र्जदार संजय गंगाराम सावंत यांना प्राथमिक शिक्षण विभागाने 246 पानांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी निधी वाटपाच्या निकषांवर प्रश्न उपस्थित करत निधीचे समान वितरण झाले का, एकाच शाळांना वारंवार निधी का देण्यात आला आणि प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता काय आहे, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरटीआय यादीत सहाण, कुर्डुस, कुसुंबळे, पेझारी, वाडगाव इत्यादी शाळांवर 2023 ते 2026 मध्ये अनेकदा दुरुस्ती, नवीन कामे मंजूर यामुळे दुरुपयोगाचा संशय निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा बहुतांश निधी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रभावक्षेत्रातील गावांमध्ये खर्च करण्यात आला असून, काही निवडक शाळांवर दोन ते तीन वेळा निधी मंजूर करण्यात आला आहे, असा आरोपही संजय सावंत यांनी केला आहे.







