रिझर्व्ह बँकेची ‘या’ दहा बँकांवर कारवाई

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा बँकांवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना 60 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता याचे उल्लंघन केल्याने हा दंड लावण्यात आला आहे. ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या बँकांमध्ये पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील बँकांचा समावेश आहे. या बँकांवर दंड आकारण्याबाबत आरबीआयने (दि.26) आणि (दि.27) मार्च रोजी निवेदन जारी केले होते. आरबीआयने सोलापूर जनता सहकारी बँकेला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बँकेवर दंड ठोठावण्यात आला आहे. 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी आरबीआयने केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला 59.90 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. निधीशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईस्थित उत्कृष्ट सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी आरबीआयने केली होती.

आरबीआयने हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. राजपालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला संचालक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना दिलेली कर्जे आणि अ‍ॅडव्हान्स यांच्या संदर्भात निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 75,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने हिमाचल प्रदेशातील मंडी येथील मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चिक्कमगलुरु जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड, चिक्कमगलुरू, कर्नाटक या बँकेला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दिंडीगुल, तामिळनाडू या बँकेला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, 1949च्या काही कलमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने मथुरा जिल्हा सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Exit mobile version