माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास प्रतिसाद

| पनवेल । प्रतिनिधी ।
नवरात्र हा स्त्री शक्तीचा सोहळा असतो. या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी शासनाच्यावतीने 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची सर्वांगीण तपासणी महापालिका क्षेत्रातील सर्व सहा नागरी प्राथमिक आरेाग्य केंद्रांवरती केली जात आहे. गेले दोन दिवसापासून या अभियानास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसात सुमारे 1 हजार 282 महिलांनी या तपासणी शिबिरीचा लाभ घेतला आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील 18 वर्षावरील जास्तीत जास्त महिलांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअभियानासाठी एमजीएमचे स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील प्रसिध्द स्त्रीरोग रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आपली सेवा देत आहेत. तसेच महिलांना व बालकांना फोलीक सीड, कॅल्शीअम, आयर्न अशी आवश्यकतेनूसारऔषधेही देण्यात येतआहे. याचबरोबर वजन, उंची, ब्लड प्रेशरही तपासले जात आहे.

याअभियानांतर्गत गर्भधारणापूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य,स्तनपान,व्यसनमुक्ती, पेाषण या विषयांवरती समुपदेशन कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. यासाठी नवविवाहित महिलांनी या अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. याबरोबरच याअभियानांमध्ये सोनोग्राफी शिबिरही घेण्यात येत आहे. यामध्ये चेस्ट एक्सरे, आवश्यकतेनूसार मॅमोग्राफी करण्यात येत आहे. तसेच रक्त तपासणीच्या माध्यमातून महिला व मातांचे हिमोग्लोबीन, थायरॉईड, रक्तातील विविध घटकांची तपासणी मोफत करण्यात येतआहे. माता-बालकांचे लसीकरणही करण्यात येत आहे. 30 वर्षावरील स्त्रीयांचे कर्करोग,रक्तदाब, मधुमेह स्क्रींनिंग करण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील सर्व महिलांनी सहभाग घेऊन आपली तपासणी करावी असे आवाहन प्रभारी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.रेहाना मुजावर यांनी केले आहे.

Exit mobile version