। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
कोणत्याही पतसंस्थेला आपल्या सभासदांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित असते. सभासदांनी चांगले योगदान दिले तरच पतसंस्था चालतात. यासाठी ठेवी वाढवून भागभांडवल वाढविणे गरजेचे असते. पतसंस्था टिकून राहणे ही पतसंस्थेच्या प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सहकार प्रशिक्षण पुणेचे प्रा. एस.बी. वटाणे यांनी मुरुडमध्ये बोलताना केले आहे.
श्री काळभैरव नागरी सहकारी पतसंस्था मुरुडच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभासद प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पतसंस्थेने कर्जदार व ठेवीदारांची संख्या वाढवून भागभांडवल वाढवणे महत्त्वाचे आहे. तरच संस्था मोठी होईल. राष्ट्रीयकृत बँका छोट्या कर्जदारांना कर्ज देत नाहीत अशांना पतसंस्था तारणहार ठरतात. सहकार चळवळीत युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. विद्यार्थ्यांनाही बचतीची सवय लावली पाहिजे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी आदित्य यादव, स्नेहामाई पाटील, सुरेश कासेकर, मनोहर कासेकर, निवास रसाळ, दीपक मयेकर, सुप्रेश खोत, भालचंद्र घुमकर, सुभाष पाटील, शंकर खेडेकर, संजय नाईक, पंचाक्षरी नाईक, रुपाली कारभारी व पतसंस्थेचे अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते.