निवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटले

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल रेल्वे स्थानकात सेवानिवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांना फलाटावर घेऊन जाण्यासाठी मदतीचा बहाणा करत दोघांनी हे कृत्य केले. या प्रकरणी पनवेल रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

गंगाराम कदम (84) असे निवृत्त सैनिकाचे नाव असून, ते ठाण्यात राहणारे आहेत. रात्री ते कणकवली येथील गावी जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात आले होते. भुयारी मार्गातून फलाटाकडे जात असताना भुयारात दोघांनी मदतीचा हात देत त्यांची बॅगही स्वत:कडे घेतली. यानंतर, काही अंतरावर गेल्यावर त्यांनी कदम यांना मारहाण करून त्यांचा मोबाइल, रोकड, घड्याळ असा ऐवज लुटून पळ काढला. एका प्रवाशाच्या मदतीने कदम यांनी घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. तसेच रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

Exit mobile version