। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा येथील सुरूच्या बनात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भलताच खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी अंधारात मद्यपींचा खेळ जोशात सुरू असून बियर व दारूच्या बाटल्यांचा खच जमा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत रेवदंडा येथील सामाजिक कार्यकर्ते सलिम तांडेल यांनी रेवदंडा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक व संबंधितांना तक्रार निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेवदंडा समुद्रकिनारी ज्येष्ठ नागरिक, स्थानिक, पै-पाहुणे, पर्यटक यांच्या सुविधेसाठी सुरूच्या बनासह नारळ व इतर शोभिवंत झाडांचा बगीचा बनविण्यात आला आहे. येथे बसण्यासाठी बाकांची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा फायदा येथे भेटीस येणार्यास सर्वांनाच होतो.
मात्र, काही मद्यपींनी या ठिकाणाला गाळबोट लावले असून, येथे रात्रीच्या वेळी हे ठिकाण दारू पिण्याचे अड्डे बनले असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी ठिकठिकाणी दारू व बियर बाटल्याचा खच पडलेला दिसतो. त्यामुळे हा परिसर पूर्णतः विद्रुप होत आहे. सलिम तांडेल यांनी रेवदंडा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणली असून, पोलीस अधीक्षक व संबंधितांना तक्रार निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, रेवदंडा पोलिसांनी रात्रीच्या वेळी या ठिकाणी टेहळणी करण्यास सुरूवात केल्याने मद्यपींमध्ये घबराह निर्माण झाली आहे.