रेवदंडा महावितरणचा ग्राहकांना शॉक

सरासरी बिलांच्या नावाखाली लूट; जाणिवपूर्वक खिशाला कात्री लावल्याचा आरोप

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणकडूनच आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जात असल्याचा गंभीर आरोप रेवदंडा परिसरातील वीज ग्राहकांकडून होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरी वीजबिलांच्या नावाखाली ग्राहकांना बिले पाठविली जात असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. एका बाजूला वाढत्या वीजबिलांचा आर्थिक भार आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटर बसविण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम, अशा दुहेरी संकटात सामान्य ग्राहक सापडला आहे.

वीज ग्राहक दर महिन्याला आपल्या कष्टाच्या कमाईतून वीजबिल भरत असताना महावितरणने मात्र ग्राहकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करणे अपेक्षित आहे. परंतु, सरासरी बिलांच्या नावाखाली सलग पाच महिने ग्राहकांकडून रक्कम आकारली जात असेल, तर त्याचा आधार काय? प्रत्यक्ष मीटर रीडिंग का घेतले जात नाही? ग्राहकांनी भरलेल्या रकमेचा नेमका हिशेब कुठे आहे? प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जास्त रक्कम आकारली गेली असेल तर ती ग्राहकांना परत मिळणार की पुढील बिलात समायोजित होणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, स्मार्ट मीटर आणि प्रीपेड वीजबिल पद्धतीवरून देशभरात चर्चा सुरू असताना केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दि.2 एप्रिल रोजी लोकसभेत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक ग्राहकाला सक्तीने बसविण्यात येणार नसून, ग्राहकांना प्रीपेड पर्याय स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महावितरणकडून काही ग्राहकांना मीटर बदलण्यासंदर्भात एसएमएस अथवा नोटिसा प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्राहकांच्या मनात भीती निर्माण करून किंवा दबाव टाकून कोणतीही व्यवस्था स्वीकारण्यास भाग पाडणे योग्य नाही. स्मार्ट मीटर आणि प्रीपेड पद्धत या दोन बाबींमधील फरकही महावितरणने स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे वीज ग्राहकांमधून बोलले जात आहे.

आम्ही दर महिन्याला वीजबिल वेळेवर भरतो, तरी गेल्या पाच महिन्यांपासून सरासरी बिलांच्या नावाखाली आमच्याकडून किती पैसे वसूल केले जात आहेत, याचा हिशेबच मिळत नाही. प्रत्यक्ष किती वीज वापरली याची माहिती न देता हजारो रुपयांची बिले पाठवली जातात. सामान्य माणसाने वीजबिल भरायचे की घरखर्च चालवायचा? महावितरणने आधी आमच्या बिलांचा हिशेब द्यावा, चुकीची आकारणी झाली असेल तर ती दुरुस्त करावी आणि स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांवर कोणतीही सक्ती करू नये. ग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार तातडीने थांबवावा.

निलेश खोत,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version