कर्जत तालुक्यातील कोटींबे येथील घटना
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोटिंबे या गावातील शेत जमिनीचा पंचनामा करताना तेथील महसूल मंडळ अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचा परिणाम जमिनीचा वर्ग बदलला असून, संबंधित शेतकरी या 104 वर्षीय महिला असल्याने त्यांच्या वयोमानाचा फायदा घेऊन हा बदल केल्याचा आरोप त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदार प्राधिकरण यांच्याकडे तक्रार केली असून, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी न्याय दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कृष्णा जाधव यांनी दिला आहे.
कोठिंबे गावात जमीन वर्ग दोन वरून वर्ग एक करण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केला. मात्र, हा पंचनामा चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप शेतकरी कृष्णा श्रीराम जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकारी व उपलेखापाल के. जी पालवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसिलदाराकडे करण्यात आली आहे. कोठिंबे येथील सर्वे क्रमांक 101/8 व 102 या जमीनबाबत 22 डिसेंबर 2025 रोजी काळुराम वाळकु सोनवणे यांनी वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यासाठी तहसिलदार कार्यालयात अर्ज केला होता या अर्जावरून तहसिलदारांनी मंडळ अधिकारी कशेळे यांना पडताळणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी अहवाल केल्यानंतर तहसिलदारांकडून वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर करण्याचे आदेश जारी करण्यात आले. यानंतर 16 जानेवारी तलाठी कोठिंबे यांनी संबंधित नोंद केली. मात्र, हा अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा दावा करीत कृष्णा श्रीराम जाधव यांनी 19 जानेवारी रोजी हरकत नोंदवली तरीदेखील मंडळ अधिकारी कशेळे यांनी 25 जानेवारी 2026 रोजी म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी हि नोंद मंजूर केल्याचा आरोप आहे. पंचनामा करताना ग्रामस्थ म्हणून ज्यांची नावे दाखवली गेली ते पंच गावाबाहेरील असून त्यांचा संबंधित जमिनीशी काहीही संबंध नाही तसेच पंचनाम्यावेळी पोलीस पाटील, कोतवाल किंवा शेजारील शेतकऱ्यांची विचारणा करण्यात आली नाही, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
तद्नंतर सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या व्यक्तीची संमती न घेता पंचनामा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात तसेच तहसीलदार यांच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या 104 वर्षाच्या आजीला घेऊन कर्जत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहोत. महसूल मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले आहेत की वर्ग दोनच्या जमिनीची चौकशी करून वर्ग एक करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे. हरकत असून सुद्धा असे करणाऱ्यांवरती गुन्हा नोंद करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा अर्ज केला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना वर्ग दोनच्या हरकती असून वर्ग एक करण्याचा ज्यांनी पदाचा गैरवापर केला आहे.त्यांच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पूर्ण जिल्ह्यातील महसूल विभागाला दिले आहेत.
