रेवस रेड्डी सागरी किनारा मार्ग फास्टट्रॅकवर

एमएसआरडीसीच्या दोन खाडीपूलाच्या कामाच्या निविदेला प्रतिसाद

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रेवस ते रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीने रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी अशा दोन खाडीपुलांसाठी तांत्रिक निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या दोन्ही खाडीपुलांसाठी एकूण पाच निविदा सादर झाल्या आहेत. रेवस ते कांरजासाठी दोन तर आगरदांडा ते दिघीसाठी तीन निविदा सादर झाल्या आहेत. तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत.

एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी असा 447 किमीचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि कोकणाला जोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत आठ खाडीपूल बांधण्यात येणार आहेत. या आठ खाडीपूलापैकी रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी अशा दोन खाडीपुलाच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन अशा दोन निविदा सादर झाल्या आहेत. आगरदांडा ते दिघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करत निविदा अंतिम केल्या जाणार असल्याचेही या अधिकार्याने सांगितले. निविदा अंतिम केल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करत या दोन्ही खाडीपुलाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असणार आहे.

Exit mobile version