पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचाही धोका
शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष; नुकसानग्रस्त शेतकर्यांचा आंदोलनाचा इशारा
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील मुरावाडी गावाजवळून व मुंबई-गोवा महामार्गाखालून जाणार्या पाण्याच्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात महामार्गालगत असणार्या एका हॉटेलमुळे तसेच महामार्गालगतच काहींनी त्यांच्या जागेत केलेल्या भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरावाडीतील सुरेंद्र ताडकर व इतर शेतकर्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास निचरा होत नसलेले हे पाणी मुरावाडी गावात जाऊन पुराचा धोकाही निर्माण झाला आहे. याप्रकरणी नागोठणे तलाठी, रोहा तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी निवेदनाद्वारे देऊनही यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्याकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सुरेंद्र ताडकर, प्रवीण ताडकर, निकेश वाघमारे, प्रभाकर ताडकर, जगदीश ताडकर, योगेश वाघमारे, नितीन वाघमारे आदी शेतकरी उपस्थित होते.
यासंदर्भात शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुरावाडीवरील जंगलातून आलेला हा पूर्वापार नैसर्गिक नाला रेल्वे मार्गाखालील व मुंबई-गोवा महामार्गाखालील मोरीतून महामार्गालगतच असलेल्या एका हॉटेलसमोरून नैसर्गिक पद्धत्तीने मार्गस्थ झाला आहे. नाल्याच्या प्रवाहाची ही जागा हॉटेलच्या मालकीची आहे. त्यामुळे याच हॉटेल मालकाने हॉटेलसमोर गाड्या पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी या नाल्याच्या प्रवाहात काही वर्षांपूर्वी एक छोटा नाला बांधून व त्यामध्ये पाईप टाकून त्यावर भराव टाकून पाण्याच्या प्रवाहाला मार्ग करून दिला आहे. मात्र, हे काम करताना पाण्याच्या मोठ्या प्रमाणातील प्रवाहाचा विचार न केल्याने त्यांनी हा नाला प्रमाणापेक्षा छोटा बांधल्याने मोठ्या पावसात जंगलातून आलेला पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यास अडथळा येत असल्याने हे पाणी आडले जाऊन मागे फिरत आहे. त्यामुळेच आडून राहिलेले पाणी शेतकर्यांच्या शेतात चार ते पाच फुटांपर्यंत तुंबून राहात असल्याने भातपीक घेणे शक्य होत नसल्याने शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
हॉटेल मालकाने बांधलेला छोट्या नाल्यामुळे व भरावामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने उद्भवलेली ही समस्या शेतकर्यांनी सर्व शासकीय यंत्रणेला मे, 2021 मध्ये लेखी निवेदनाद्वारे निदर्शनास आणूनही यंत्रणेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच नुकसानीचा साधा पंचनामाही नागोठणे तलाठ्यांकडून अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुरावाडीतील शेतकर्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोरोना काळात स्थळ पाहणी बंद होती, मात्र आता याप्रकरणी तक्रारदार शेतकरी व सामनेवाले या दोघांनाही बोलविण्यात येईल तसेच स्थळ पाहणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(छायाचित्र : महेश पवार)