| खोपोली | वार्ताहर |
बोरघाटातील सायमाळजवळ रविवारी सकाळी रिक्षा मिनीबसला जाऊन धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर दोघेजण जखमी झाले आहेत. त्यापैकी पैकी 1 जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने उपचार करण्यासाठी नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मधे रिक्षा चालकाचा सामावेश आहे.
सकाळी 10.50 च्या दरम्यान (एम. एच. 14 एच. एम. 5296) या रिक्षामधून रेल्वेचे कर्मचारी लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्कमध्ये खोपोली रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी निघाले होते. बोरघाटातील सायमाळ जवळच्या वळणावरील तीव्र उतारावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटी होऊन खोपोलीकडून पुण्याकडे निघालेल्या (एम एच 04 जी 9925) प्रवासी बसला धडकली. अपघात एवढ्या गंभीर स्वरूपाचा होता की यातील कुमार गौरव गौतम (वय 26) त्याचा जागीच मृत्यू झाला. शत्रुंजय त्रिपाठी (वय 27) हा गंभीर जखमी तर राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक, रिक्षा चालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले. शत्रुंजय त्रिपाठी याला पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचाही मृत्यू झाला.
अपघातात राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. तर कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हे देखील सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते. रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे.
अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोनही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक पोलीस बोरघाटचे डिव्हिजनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अनिल शिंदे आणि डेल्टा फोर्सच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्यानी मदतकार्य करून जखमींना रुग्णवाहिकेतून पुढे हलवले. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे अपघाताचा पुढील तपास करत आहेत.