। पनवेल । प्रतिनिधी ।
ऑनलाईन गेमिंगमधून घरबसल्या करोडपती होण्याच्या मोहात पडलेल्या उलवे येथील एका 25 वर्षीय रिक्षाचालक तरुणाला तब्बल 1 कोटी 26 लाख 86 हजार 778 रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर टोळीने ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकवून ही रक्कम उकळल्याचे समोर आले असून, याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर टोळी तसेच संबंधित गेमिंग ॲप चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उलवे परिसरात राहणारा हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सन 2024 मध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहत असताना त्याला एका ऑनलाईन गेमिंग ॲपची जाहिरात दिसली. गेम खेळून मोठी रक्कम जिंकण्याचे आणि ती त्वरित बँक खात्यात जमा करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या जाहिरातीला भुलून त्याने ॲप डाउनलोड करून स्वतःचा अकाऊंट तयार केला. सुरुवातीला त्याने तीन पत्ती, कॅसिनो, क्रिकेट आणि फुटबॉल यांसारख्या गेमवर कमी रकमेने खेळण्यास सुरुवात केली. सायबर टोळीने त्याने जिंकलेली काही छोटी रक्कम त्याच्या खात्यात जमा करून त्याचा विश्वास संपादन केला. मोठा नफा मिळेल या अपेक्षेने तो हळूहळू या जाळ्यात अडकत गेला.
त्यानंतर 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत त्याने फोनपे आणि विविध यूपीआय आयडीच्या माध्यमातून तब्बल 400 हून अधिक वेळा पैसे ट्रान्सफर केले. या कालावधीत त्याने एकूण 1 कोटी 26 लाख 86 हजार 778 रुपये गेममध्ये लावले. दरम्यान, त्याच्या गेमिंग अकाऊंटमध्ये जिंकलेली तब्बल 90 लाख रुपयांची रक्कम दिसत होती. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती मिळाली नाही. काही दिवसांनी अकाऊंटमधून ही रक्कमही गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.






