रिंकू-राणाचा पुन्हा धमाका

कोलकाताची चेन्नईवर मात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने चेन्नईचा पराभव केला. चेन्नईने दिलेले 145 धावांचे आव्हान कोलकात्याने सहा गडी आणि नऊ चेंडू राखून सहज पार केले. चेन्नईकडून दीपक चाहर याने तीन गडी बाद केले. या विजयासह कोलकात्याचे अंतिम चारमधील आव्हान जिवंत राहिले असून, चेन्नईचे आव्हान अधिक खडतर झाले आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीसोबत असणारा अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य झाले आहे.

145 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकात्याला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बद झाला. गुरबाजनंतर वेंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. त्याने दोन चौकारांसह नऊ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला जेसन रॉयही लगेच तंबूत परतला. पावरप्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. दीपक चहरने भेदक मारा करत कोलकात्याची आघाडीची फळी तंबूत धाडली. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटले, पण रिंकू सिंह आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला.
सुरुवातीला संयमी फलंदाजी करत खेळपट्टीचा अंदाज घेतला. रिंकू सिंह आणि कर्णधार नीतीश राणा यांनी अर्धशतकी भागिदारी करत चेन्नईच्या हातातून विजय हिसकावून आणला. चौथ्या विकेटसाठी रिंकू आणि राणा यांनी 76 चेंडूंत 99 धावांची भागिदारी केली. रिंकूने 43 चेंडूंत 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. कर्णधार नीतीश राणाने नाबाद 57 धावांची खेळी केली. या खेळीत राणाने एक षटकार आणि सह चौकार लगावले. आंद्रे रसेल दोन धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, चेन्नईकडून दीपक चहर याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. दीपक चहर याने तीन बळी मिळविल. त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला गडी बाद करता आला नाही. रविंद्र जाडेजा, तुषार देशपांडे, मोईन अली, महिश तिक्ष्णा, पथिराणा यांची गोलंदाजी प्रभाव पाडू शकली नाही.

Exit mobile version